| | नागपूर। दि. १३ (क्रीडा प्रतिनिधी) पहिल्या पर्वात इतिहास निर्माण करणार्या फ्रॅन्चायसीवर आधारित नागपूर प्रीमिअर लीग (एनपीएल) फुटबॉल स्पर्धेच्या दुसर्या पर्वाचा स्थानिक यशवंत स्टेडियमवर भरगच्च प्रेक्षकांच्या साक्षीने आज शानदार समारंभात प्रारंभ झाला. अर्थात 'किक ऑफ' झाला. एनपीएलच्या पहिल्या पर्वाला नागपूरकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची झलक आजही अनुभवायला मिळाली. स्टेडियमचे चारही कोपरे प्रेक्षकांनी 'ज्ॉम पॅक' होते. सोबतीला डोळ्यांचे पारणे फेडणारा विविधरंगी लेझर शो, आसमंत उजळून टाकणारा भव्य फटाका शो आणि द. आफ्रिकन ड्रमच्या तालावर सादर झालेला वाद्यवृंद या मनोरंजनाच्या मेजवानीसह दिमाखदार सोहळा अविस्मरणीय ठरला. यशवंत स्टेडियमवर उपस्थित विक्रमी गर्दीने या शानदार समारंभाला वारंवार टाळ्यांचा कडकडाट करीत दिलखुलास दाद दिली. उद््घाटन सोहळ्याचे मुख्य अतिथी वेंकीज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तसेच यूकेतील प्रतिष्ठेच्या ब्लॅकबर्न रोव्हर्स क्लबचे मालक बालाजी राव हे होते. कान्सुल जनरल ऑफ रिपब्लिक ऑफ रवांडा आणि इन्स्पिरा ग्रुपचे चेअरमन प्रकाश जैन हे प्रमुख पाहुणे होते. या वेळी जैन यांच्या पत्नी मंजू जैन, लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा, मुंबईचे प्रसिद्ध डेव्हलपर्स सुभाष रुणवाल, रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, खासदार दत्ता मेघे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, एस. क्यू. जामा, महापौर अर्चना डेहनकर, उपमहापौर शेखर सावरबांधे, मनपा आयुक्त संजीव जैस्वाल, नासुप्र चेअरमन प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त अंकुश धनविजय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, उद्योगपती पद्मेश गुप्ता आणि रायसोनी ग्रुपचे चेअरमन सुनील रायसोनी, लोकमत नागपूरचे संचालक (ऑपरेशन) अशोक जैन यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आ. देवेंद्र फडणवीस आणि मनपा स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी यांनीही स्पर्धेला भेट दिली. या वेळी छोटेखानी भाषणात बालाजी राव म्हणाले, ''मी एनपीएलच्या लोकप्रियतेबाबत ऐकले आहे. ही स्पर्धा भविष्यात आणखी लोकप्रिय होईल, अशी मला आशा आहे. एनपीएल भविष्यात नॅशनल लीग बनेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.'' जैन यांनीदेखील एनपीएलचे कौतुक करीत नागपूरकरांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ''या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असले तरी लोकांचा उत्साह आणि जल्लोष पाहून दहा वर्षे जुनी असल्याची खात्री पटते. लोकमतचे हे उत्कृष्ट कार्य प्रशंसनीय असून ही स्पर्धा यशाची नवी उंची गाठेल.'' खा. विजय दर्डा यांनी बालाजी राव आणि प्रकाश जैन तसेच सुभाष रुणवाल यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. अन्य अतिथींचे स्वागत निलेशसिंग, आशिष जैन आणि आसमना सेठ यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. एनपीएलच्या पहिल्या सत्रावर काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन बालाजी राव यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा शुभंकर गोलू व्यासपीठावर येताच बालाजी राव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले. तत्पूर्वी, दीप प्रज्वलनाद्वारे सोहळ्याची सुरुवात झाली. पाहुण्यांनी एनपीएल ध्वजारोहण केल्यानंतर लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा ' बाबूजी' यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर सहभागी सर्व दहा संघांतील खेळाडूंनी एनडीएफए तसेच लोकमतच्या चमूसह मैदानात पथसंचलन करीत चाहत्यांना अभिवादन केले. सर्व अतिथींनी मैदानाच्या मध्यभागी येऊन हवेत फुगे सोडले आणि स्पर्धा सुरू होत असल्याची घोषणा झाली. लोकमत नागपूरचे महाव्यवस्थापक नीलेश सिंग यांनी प्रास्ताविक केले. या वेळी नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष हरेश व्होरा यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन डॉ. राम ठाकूर यांनी केले.
|
मेघे युनायटेडने रायसोनी अचिव्हर्सला रोखले | सामना १-१ ने ड्रॉ | | | नागपूर । दि. १३ (क्रीडा प्रतिनिधी) लोकमततर्फे आयोजित नागपूर प्रीमिअर लीग (एनपीएल) फुटबॉल स्पर्धेच्या दुसर्या पर्वात आज शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेली सलामी लढत अखेर अनिर्णीत संपली. रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत मेघे युनायटेडने अनुभवी रायसोनी अचिव्हर्सला १-१ गोलने बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. मेघे युनायटेडतर्फे नावेद अख्तरने मध्यंतरानंतर बरोबरी साधणारा गोल नोंदवला. यशवंत स्टेडियममध्ये उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेली ही लढत अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरली. रायसोनी अचिव्हर्सतर्फे ४0 व्या मिनिटाला रवी अर्खेलने तर मेघे युनायटेडतर्फे ६७ व्या मिनिटाला नावेद अख्तरने गोल नोंदवले. सुरुवातीला मेघे युनायटेडने वर्चस्व गाजवल्यानंतर रायसोनी अचिव्हर्स संघाने चांगल्या चाली रचत तुल्यबळ लढत दिली. रायसोनी अचिव्हर्सतर्फे व्यावसायिक खेळाडू टॅन्को अबुबाक्केरला ११ व्या मिनिटाला गोल नोंदवण्याची नामी संधी होती, पण मेघे युनायटेडचा गोलरक्षक मिहीर सावंतने त्याचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. रायसोनी संघाला पुन्हा एकदा २२ व्या मिनिटाला गोल नोंदवण्याची संधी होती. टॅन्कोने मेघे संघाच्या तीन बचावपटूंना गुंगारा देत गोलक्षेत्रावर चढाई केली, पण पुन्हा एकदा सावंतने चांगला बचाव केला. दोन प्रयत्नात अपयशी ठरलेल्या रायसोनी संघाने ४0 व्या मिनिटाला खाते उघडले. रवी अर्खेलने डाव्या बगलेतून चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवत स्पर्धेतील पहिला गोल नोंदवला. मध्यंतराला खेळ थांबला त्यावेळी रायसोनी अचिव्हर्स संघ १-0 गोलने आघाडीवर होता. मध्यंतरानंतर मेघे युनायटेडने वर्चस्व गाजवले. फॉरवर्ड नावेद अख्तरने दिलेल्या पासवर अझर शेखला गोल नोंदवण्यात अपयश आले. त्यानंतर पाच मिनिटांनी रायसोनी अचिव्हर्सला गोल नोंदवण्याची संधी होती, पण अब्दुल जाफरला गोल जाळ्याचा वेध घेण्यात अपयश आले. ६७ व्या मिनिटाला मेघे युनायटेड संघाला यशाची चव चाखता आली. अझर शेखने चांगली चढाई करताना गोलजाळ्याच्या दिशेने मारलेला चेंडू साईड बारला लागला. त्यावर मिळालेल्या संधीचा अचूक लाभ घेत नावेद अख्तरने चेंडूला गोल जाळ्याचा मार्ग दाखवत मेघे युनायटेडला बरोबरी साधून दिली. आघाडी गमावल्यामुळे दडपणाखाली आलेल्या रायसोनी अचिव्हर्स संघाचा व्यावसायिक खेळाडू अनेटिव्ह बांग्वाने नियमबाह्य पद्धतीने मेघे युनायटेडच्या खेळाडूला रोखले. त्यामुळे त्याला पंचानी रेड कार्ड दिले. शेवटच्या क्षणी उभय संघांनी गोल नोंदवण्यासाठी चांगल्या चाली रचल्या, पण त्यांना यश आले नाही. रवी अर्खेल (रायसोनी अचिव्हर्स) आणि नावेद अख्तर (मेघे युनायटेड) संयुक्तपणे सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. |
|
No comments:
Post a Comment